Friday, July 25, 2014

पुण्यातील नवे गतिरोधक

अनेक नविन गोष्टींची सुरुवात पुणे महानगरपालिका करते. पण त्या करण्यापूर्वी त्याचा पूर्ण अभ्यास करण्याचे कष्ट महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि आपले नगरसेवक करतात की नाही हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल.
पुणे शहर हे पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात असे, तेव्हा ना गाड्यांची गर्दी असे न वेगात चालणाऱ्या दुचाकींची. त्यामुळेच तेव्हा रस्त्यावर गतिरोधक बनविण्याची आवश्यकता नसे. पण आता पुण्याची लोकसंख्या ज्या वेगाने वाढली आहे त्याही पेक्षा जास्त पुण्यातील वाहनांची संख्या वाढली आहे.
पूर्वी रस्त्यांवर अत्यंत कमी प्रमाणात गतिरोधक असत. पण आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की  दर दोन मिनिटांनी गाडी गतिरोधकावरून जाते.
पूर्वी कमी उंचीचे तीन उंचवटे असलेले गतिरोधक बनविले जात. त्यानंतरच्या काळात थोडा जास्त उंचीची एकच उंचवटा गतिरोधक म्हणून बनविला जाऊ लागला. आता काही ठिकाणी पादचाऱ्यांच्या सोईसाठी थोडा जास्त उंचीचा व रुंदीचा गतिरोधक बनविला जातो.
हे सर्व गतिरोधकांचे प्रकार पुणेकरांनी पाहिले व ते स्वीकारलेही........
पण आता पुण्यात जे अत्याधुनिक फायबरचे गतिरोधक निर्माण केले जात आहेत ते म्हणजे पुणेकरांच्या सहनशक्तिचा अंत पाहणारे व अत्यंत गैरसोईचे आहेत. हे गतिरोधक बसविताना वाहनचालकांचा व मागे बसणाऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार महापालिकेतील विद्वान लोकांनी एकतर केलेला दिसत नाही किंवा ते विद्वान चारचाकी वातानुकूलित गाड्यांमधून फिरणारे तरी असले पाहिजेत.
डांबरी गतिरोधक वर्षानुवर्षे टिकतात व रस्ता तयार करताना गतिरोधक निर्माण करताना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण या फायबरच्या गतिरोधकांच्या पट्ट्या काही दिवसातच निघायला लागतात व अशा निघून गेलेल्या ठिकाणावरून गाडी घालण्यासाठी सर्व वाहनचालकांमध्ये स्पर्धा सुरू होते, त्यामुळे अपघाताचे धोके वाढतात. तसेच या पट्ट्या निघून गेल्या तरी त्या बसविण्यासाठी ठोकण्यासाठी आलेले खिळे रस्त्यात तसेच असतात. त्यामुळे टायर फुटण्याचा धोका संभवतो.
पूर्वी जे डांबरी गतिरोधक असत त्यावर गाडी चढण्यासाठी व उतरण्यासाठी थोडासा उतार असे. त्यामुळे गाडीचा वेग कमी केल्यावर या गतिरोधकांवरून जाताना कोणताही त्रास जाणवत नसे व गाडी आदळत नसे. पण या फायबरच्या गतिरोधकांना कोणत्याही प्रकारचा उतार नाही हे गतिरोधक रस्त्यात जागेवरच वर आलेले असतात, त्यामुळे या गतिरोधकांवरून गाडी कितीही सावकाश नेली तरी मागचे चाक गतिरोधकावरून रस्त्यावर येताना जोरात आदळते.
महापालिकेतील विद्वानांनी हे गतिरोधक बसविताना पुण्यातील वृद्ध, लहान मुले व गरोदर स्त्रीया दुचाकी वाहनांवर प्रवास करत नसल्याचा गैरसमज करून घेतलेला दिसतो.
हे सर्व धोके असून सुद्धा नवे गतिरोधक बसविताना महापालिकेने वाहनचालकांच्या हिताचा विचार केला आहे की फायबरचे गतिरोधक बनविणाऱ्या कंपन्यांचा हे कळत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे मागे एकदा हाय कोर्टाने पुण्यातील गतिरोधकांची निर्मीती शास्त्रीय पद्धतीने व नियमांप्रमाणे करण्याचा आदेश दिला होता. तेव्हा महापालिकेने अत्यंत घाईघाईने जास्त उंचीच्या गतिरोधकांची उंची कमी करण्याची मोहिम हाती घेतली होती. हे सर्व माहित असूनही जर महापालिकेतील विद्वान परत त्याच त्या चुका करीत असतील तर त्याला पुणेकरांनीच विरोध केला पाहिजे.
आपल्या अवलोकनार्थ गतिरोधक कसा असावा त्याचे तसेच जुन्या व नव्या गतिरोधकांची चित्रे खाली दिली आहेत.
माझ्या विचारांवर आपले मत जरूर व्यक्त करा. आपण माझ्या मताशी सहमत असाल तर आपले समर्थन व्यक्त करा. तसेच असहमत असाल तरी आपले मत मला कळवा कारण हा पत्रप्रपंच पुणेकरांच्या हितासाठीच आहे.